Home राजकीय मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; मुंडेंसोबत वाद सुरु असतानाच चौकशीसाठी बोलावलं

मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; मुंडेंसोबत वाद सुरु असतानाच चौकशीसाठी बोलावलं


मुंबईलाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटलांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी त्यांनी केलेल्या आंदोलनाच्या संदर्भात हे समन्स बजावले गेले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले होते. पोलिसांच्या परवानगीशिवाय हे आंदोलन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी आता चौकशी सुरू केली असून जरांगे पाटील यांच्यासह पांडुरंग तारक, गंगाधर कालकुटे, चंद्रकांत भोसले, वीरेंद्र पवार आणि प्रशांत सावंत या पाच जणांनाही समन्स बजावण्यात आले आहे.

दरम्यान, जरांगे पाटील हे अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळेही चर्चेत आहेत. “माझ्या हत्येचा कट मुंडे यांच्या सांगण्यावरून रचण्यात आला,” असा गंभीर आरोप जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या वक्तव्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आणि “माझी व जरांगे पाटलांची ब्रेन टेस्ट करा,” अशी मागणी केली. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी देखील केली आहे.

राज्यभर मराठा आरक्षणासाठी चळवळ उभारणारे मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून प्रकाशझोतात आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते. मात्र, आता पोलिसांच्या समन्समुळे त्यांची अडचण वाढल्याचे मानले जात आहे. जरांगे पाटील 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

राजकीय पातळीवर आणि सामाजिक क्षेत्रात चर्चेत असलेल्या जरांगे पाटलांवरील चौकशीची ही नवी कारवाई आगामी काळात नवे वाद निर्माण करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound