जळगाव, प्रतिनिधी । प्लास्टिक उद्योग क्षेत्रातील नवनवीन संशोधन, उत्पादने, बाजारपेठेतील स्थिती यांची एकत्रितपणे सर्वांना माहिती मिळावी आणि या क्षेत्रातील अडीअडचणींवर तज्ज्ञ उद्योजकांशी थेट संवाद साधता व्हावा, यासाठी मार्गदर्शक ठरणारे ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०’ हे प्रदर्शन १६ ते २० जानेवारी, २०२० दरम्यान ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असो.तर्फे मुंबई येथे बॉम्बे एक्झीबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत केली. यावेळी कैलास मुरारका, किशोर संपत, रवी लढ्ढा, रवी फालक, विनोद बियाणी, समीर साने, संतोष इंगळे यांची उपस्थिती होती.
अशाप्रकारचे हे ११ वे भव्य प्लास्टिक प्रदर्शन असून याची गणना जगातील पाच मोठ्या अशाप्रकारच्या प्रदर्शनांमध्ये करण्यात येते, ज्यात ३ महिने आधीच सर्व स्टॉल्स बुक झालेले असतात. या उद्योग क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागातील (सेगमेंट) १५०० हून अधिक प्रदर्शकांनी आपले जागेचे आरक्षण आधीच केले आहे. सुमारे १ लाख चौ.मी. क्षेत्रात भरणारे हे प्रदर्शन त्याच्या भव्यतेमुळे चर्चेचा विषय ठरले आहे.
शासन मान्यतेची मोहर
‘युएफआय’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या सर्वोच्य समितीसह भारत सरकारनेही ‘प्लास्टिव्हिजन इंडिया २०२०’ ला मान्यता दिली आहे. तसेच एनएसआयसी व एमएसएमई विभागातर्फे लघु आणि मध्यम नवउद्योजकांना आर्थिक अनुदानही देण्यात येणार आहे.
२५ देशांचा सहभाग
या अतिभव्य प्रदर्शनात २५ देशातील उत्पादकांनी आपला सहभाग निश्चित केल्याने येथे नवनवीन तंत्रज्ञान आणि यंत्रसामग्री पाहायला मिळेल. या प्रदर्शनकाळात या क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार असून त्यासाठी विशेष तांत्रिक सत्रे होतील. त्यातून या क्षेत्रातील तज्ज्ञ नवीन प्रवाह आणि तंत्रज्ञानाच्या अद्ययावत स्वरूपाविषयी माहिती देतील.
७ भव्य मंडप
या प्रदर्शनात ७ भव्य मंडपातून अनुक्रमे कृषी, सौरऊर्जा, ऑटोमेशन, डाय आणि मोल्ड, वेस्ट मॅनेजमेंट (टाकावूतून टिकावू) आणि श्री डी प्रिटिंग या क्षेत्रातील अनुभवी उद्योजक त्यांचे उत्पादन तसेच सेवा या संदर्भात मार्गदर्शन आणि सादरीकरणही करतील. त्याचप्रमाणे या क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्या संस्था आणि उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्यात
या प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ‘प्लास्टिव्हिजन इंडिया’ची संपूर्ण टीम जोमाने कामाला लागली आहे. त्या अनुषंगाने देशभर ५० हून अधिक रोड शोद्वारे सुमारे अडीच लाखाहून अधिक व्यावसायिकांना याकडे आकर्षित करण्याचा मानस आहे. आजवर लुधियाना, चंदीगड, कोल्हापूर, गोवा, कोलकाता, मदुराई आणि कोयम्बतूर आदी मोठ्या शहरांमधील हे रोडशो यशस्वी ठरले आहे. प्रदर्शनात सहभाग आणि दर्शक म्हणून येणार्यांच्या निवासाची अत्यंत माफक दरात व्यवस्था करण्यात येणार आहे. यात या क्षेत्रातील उत्पादक, उद्योजक आणि संशोधकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लघु उद्योग भारती आणि अन्य संस्थांनी केले आहे.