मुंबई प्रतिनिधी । परमबीर यांच्या लेटर बाँब प्रकरणी राजीनामा द्यावा लागणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठविले आहेत.
परमबीर यांच्या आरोपानंतर उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार अनिल देशमुख यांना पदाचा राजीनामा तर द्यावा लागलाच, पण आता त्यांची सीबीआय चौकशी होणार आहे. यासोबत सीबीआयने आता देशमुख यांच्या सोबत त्यांच्या सहकार्यांची झाडाझडती घेण्याचे संकेत दिले आहेत.
अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या कुंदन आणि पालांडे यांना सीबीआयने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. सीबीआयने याप्रकरणात नुकतीच परमबीर सिंह आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची चौकशी केली होती. त्यावेळी पालांडे यांनीच संजय पाटील आणि डीसीपी राजू पाटील यांना 100 कोटी रुपये वसूल करण्यासंदर्भात सांगितले होते, अशी माहिती परमबीर सिंह यांनी सीबीआयला दिली होती. प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपये वसूल झाले पाहिजेत, अशी अनिल देशमुख यांची अपेक्षा असल्याचे पालांडे यांनी दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते.
सीबीआय रविवारी या दोघांचे जबाब नोंदवणार आहे. त्यामुळे आता या चौकशीतून सीबीआयच्या हाती कोणती माहिती लागणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.