जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथील नराधमाने अल्पवयीन मुलगी एकटी असल्याची संधी साधुन अश्लिल चाळे करून पिडीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. याप्रकरणी आज न्यायालयाने नराधमास दीड वर्षे आणि आठ हजार रूपये दंड ठोठावला आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे 26 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरात शाळेत जाण्यासाठी तयारी करत असतांना आरोपी श्रीकृष्ण रवींद्र पाटील (वय-21) रा. चिंचखेडा ता.जामनेर घरात एकटी असल्याची संधी साधुन घरात घुसला, पिडीतेच्या तोंडावर हात ठेवून तोंड दाबले आणि तु जर आरोळ्या मारल्या तर तुला चाकु खूपसुन मारून टाकेन अशी धमकी देवून तिला लज्जा उत्पन्न होईल असे चाळे करून विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीसात आरोपी श्रीकृष्ण पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणातील तपासाधिकारी पोउनि माधुरी बोरसे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. याप्रकरणात 6 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एस.जी.ठुबे यांनी सर्व पुरावे आणि साक्षिदार अंती आरोपी श्रीकृष्ण पाटील याला दोषी ठरवत दीड वर्ष सक्त मजुरी आणि दोन कलमाखाली आठ हजार रूपये दंड, दंड न भरल्यास 12 महिने साधी कैद सुनावण्यात येणार आहे. दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्यात यावी. सरकार पक्षातर्फे ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी काम पाहिले.