मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील कोऱ्हाळा परिसरात उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःचे पाप लपवण्यासाठी किंवा अन्य कारणास्तव एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला शेतातील काटेरी झुडपात सोडून दिले. उघड्यावर टाकल्यामुळे झालेल्या दुखापतीमुळे या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यात कोऱ्हाळा गावच्या शिवारातील वामन अमृत धाडे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या काटेरी झुडपात एक नवजात स्त्री अर्भक मृतावस्थेत आढळून आले. ही घटना ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. पोहेकॉ श्रावण दशरथ भिल्ल यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी हे करीत आहे.




