मुक्ताईनगर प्रतिनिधी | तालुक्यातील वडोदा वन परिक्षेत्रातील वनरक्षकास धक्काबुक्की करून धमकावल्याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वडोदा वन परिक्षेत्रातील शासकीय कामात अडथळा आणून वनरक्षकास शिवीगाळ केल्याच्या कारणावरून येथील एका इसमाविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास नियत वनक्षेत्र वडोदा कंपार्टमेंट क्रमांक ५६१ मध्ये घडली.
याबाबत मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनपरिक्षेत्र कार्यालयात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानोबा मोहनराव धुळगंडे (वय ५१) रा. कुर्हा वनपरिक्षेत्र कार्यालय यांनी फिर्याद दिली. त्यानुसार रहिम पवार, रा.हलखेडा हा जंगली डुकरांना मारण्याकरिता ठेवलेले गोळे घेऊन परत येत असताना वन रक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांनी त्यास सांगितले की, तुम्हाला वन्य प्राण्यांना मारण्याचा अधिकार नाही. यामुळे वन्य प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो असे समजून सांगत असताना पवारला राग आला. त्याने धुळगंडे यांच्या कामकाजात अडथळा निर्माण करून शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करून जमिनीवरील दगड मारून त्यांच्या डाव्या हातास मारून दुखापत केली. त्यानुसार पवाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोनि खताळ यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक परविन तडवी करत आहेत.