गुटखा तस्कराचे वाहन परस्पर सोडले : पीएसआयसह चार पोलीस निलंबीत

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामार्गावरून पकडलेले गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी येथील पोलीस उपनिरिक्षक तसेच चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगरसह परिसरातून मध्यप्रदेशातून जळगाव तसेच परिसरातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक होत असते. यात काही वेळेत थातुरमातूर कारवाई वगळता मोठी कार्यवाही होत नाही. गेल्याच आठवड्यात तर थेट आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुटख्याची वाहतूक करणारी कार पकडून दिल्यामुळे हा प्रकार अजून चर्चेत आला होता. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच गुटखा तस्करी प्रकरणात करण्यात आलेली मोठी कारवाई ही चर्चेचा विषय ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली. यानंतर हे वाहन पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. तथापि, यावर कोणतीही कार्यवाही न करता हे वाहन सोडून देण्यात आले. पोलीस महानिरिक्षक दत्तात्रय कराळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या संदर्भात सखोल चौकशी करून सदर प्रकरणात संशयास्पद भूमिका घेणारे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात कार्यरत उपनिरिक्षक राहूल बोरकर यांच्यासह हवालदार गजानन महाजन, कॉन्स्टेबल डिगंबर कोळी व निखील नारखेडे तसेच नाईक सुरेश पाटील यांना निलंबीत केले आहे. म्हणजेच या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकाचे पाच कर्मचारी निलंबीत झाले आहेत.

मुक्ताईनगरचे पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. दरम्यान, गुटखा तस्करी प्रकरणात थेट पीएसआयसह चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर यातून गुटखा तस्करीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Protected Content