मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवैध मांस तस्करीविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अंतुली शिवारात विना परवाना आणि छुप्या पद्धतीने १३० किलो गोमांसाची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षेवर पोलिसांनी झडप घातली. या कारवाईत रिक्षासह एकूण ३५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन संशयितांविरुद्ध मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१७ जानेवारी) सकाळी ८:३० ते ९:०० वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर-अंतुली शिवारात जगदीश महाजन यांच्या शेताजवळून एक विना क्रमांकाची रिक्षा संशयास्पद रितीने जात होती. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पथक गस्तीवर असताना त्यांनी ही रिक्षा अडवली. रिक्षेची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मांस आढळून आले.

तपासात असे समोर आले की, आरोपी शेख शकील शेख शकूर (रा. आझादनगर, बऱ्हाणपूर) आणि मोहम्मद इलियास मोहम्मद याकुब (रा. खैराती बाजार, बऱ्हाणपूर) यांनी मुक्ताईनगर येथील कुरेशीवाड्यातील रहिवासी आरिफ शेख उस्मान याच्याकडून सुमारे १० हजार ४०० रुपये किमतीचे १३० किलो गोमांस खरेदी केले होते. ८० रुपये प्रति किलो या दराने हे मांस विकत घेऊन त्याची बेकायदेशीररीत्या वाहतूक केली जात होती. पोलिसांनी २५ हजार रुपयांची रिक्षा आणि मांस असा एकूण ३५ हजार ४०० रुपयांचा माल हस्तगत केला आहे.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख शकील शेख शकूर (रा. आझादनगर, बऱ्हाणपूर), मोहम्मद इलियास मोहम्मद याकुब (रा. खैराती बाजार, बऱ्हाणपूर) आणि आरिफ शेख उस्मान रा. मुक्ताईनगर विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल लीलाधर भोई पुढील तपास करत आहेत.



