मुक्ताईनगर, पंकज कपले । येथील नगरपंचायतीमधील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे समर्थक असणार्या सहा नगरसेवकांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर चार नगरसेवक उद्या प्रवेश घेणार आहेत. यामुळे मुक्ताईनगर नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. यात नजमा तडवी या लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या असून यासोबत भाजपचे १२ नगरसेवक निवडून आले होते. हे सर्व नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही येथील नगराध्यक्षा व इतर नगरसेवकांनी पक्षांतर केले नव्हते. अर्थात, ते खडसे समर्थक म्हणूनच ओळखले जात होते. मात्र अलीकडच्या काळात सत्ताधारी गटात कुरबुरी सुरू झाल्या. यातच दोन दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांना बहुमताने मंजुरी देण्यात आल्याने राजकीय धुरिणांच्या भुवया उंचावल्या होत्या. याप्रसंगी नगराध्यक्षांसह सहा नगरसेवकांनी शिवसेनेला साथ दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले होते.
या पार्श्वभूमिवर, आज मुक्ताईनगर नगरपंचायतीतील दहा नगरसेवक हे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी मातोश्रीवर दाखल झाले. यातील सहा नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. तर चार जणांचा प्रवेश उद्या होणार आहे. https://livetrends.news यामुळे येथील नगरपंचायतीवर आता शिवसेनेचा भगवा फडकला असून एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
मार्च महिन्याच्या अखेरीस जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात थेट भाजपमध्ये उभी फूट पडून एक मोठा गट शिवसेनेत दाखल झाला होता. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच मुक्ताईनगरातही हाच पॅटर्न राबविण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. यामुळे महापालिकेच्या पाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतीतही झालेले सत्तांतर हे शिवसेनेची ताकद वाढविणारे ठरले आहे.https://livetrends.news यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चंद्रकांत पाटील यांनी अचूकपणे लक्ष्यभेद केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, जळगाव आणि मुक्ताईनगरच्या पाठोपाठ आता जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील हाच पॅटर्न राबविण्यात येणार असल्याच्या चर्चेला जोर चढला आहे. यात भुसावळ नगरपालिकेत आधीच शिवसेनेने चाचपणी केली असून https://livetrends.news तेथून नगरसेवकांचा मोठा गट हा शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. तर जिल्हा परिषदेतही मध्यंतरी सत्तांतराचे वारे वाहू लागल्याचे दिसून आले होते. याची चर्चा सध्या थंडावली असली तरी मुक्ताईनगरातील सत्तांतरामुळे जिल्हा परिषदेतही सत्तांतर होणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.