मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील शेमळदे येथील एका शेतकर्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. उपस्थितांनी सतर्कता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत वृत्त असे की, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या दौर्यात येथील उपजिल्हा रूग्णालयात पाहणी केली. या हॉस्पीटलमध्ये कोविडच्या प्रतिकारासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या असून याबाबत फडणवीस यांनी माहिती जाणून घेतली.
यानंतर फडणवीस यांनी तालुक्यातील शेतकर्यांच्या नुकसानीची पाहणी केली. यात तालुक्यातील शेमळदा शिवारातून ते पाहणी करून जात असतांना एका शेतकर्याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी सतर्कता दाखविल्याने अनर्थ टळला. या शेतकर्याचे नाव योगेश पाटील असून नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही मदत न मिळाल्याने ते संतप्त झाले आहेत. याचमुळे योगेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्यावर टीका देखील केली.