मुक्ताईनगर प्रतिनिधी | ग्रामसभा होत नसल्याने ठिबकचे अनुदान मिळण्यात येणार्या अडचणींबाबत जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने यावर कार्यवाही करून बैठकीचे आयोजन केले आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना म्हणजेच पोकरा योजनेच्या अंतर्गत शेतकर्यांना ठिबक संचाचे अनुदान देण्यात येते. या अनुदानासाठी संबंधीत योजनेसाठी गठीत करण्यात आलेली त्या गावाची समिती आणि ग्रामसभेचा ठराव बंधनकारक करण्यात आला आहे. तथापि, कोरोनामुळे लागोपाठ दुसर्या वर्षी देखील ग्रामसभा होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकर्यांना ठिबक संचाचे अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.
नेमकी हीच समस्या लक्षात घेऊन जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र लिहून या प्रकरणी काही तरी तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यांनी २९ जुलै रोजी हे पत्र उपमुख्यमंत्र्यांना दिले. यावर अजितदादा पवार यांनी तात्काळ बैठकीचे आयोजन केले. या संदर्भातील बैठक सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी होणार असून याला रोहिणीताई खडसे यांनी उपस्थित रहावे असे त्यांना कळविण्यात आले आहे.
या बैठकीला या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विश्वजित कदम, रोहिणी खडसे, ग्राम विकास व कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, प्रकल्प संचालक यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीतून शेतकर्यांचे रखडलेले ठिबक संचाचे अनुदान मिळण्यासाठी काही तरी तोडगा निघेल अशी शक्यता आहे.