मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज विधानपरिषदेत गुटखा तस्करी गाजली असतांनाच रात्री पुन्हा एकदा चोरीचा गुटखा पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मुक्ताईनर शहरातील प्रमुख चौक असणार्या प्रवर्तन चौकात आज रात्री आठ वाजेच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एमएच१९ सीवाय-४७९२ क्रमांकाचे बोलेरे पीक अप वाहन पकडले. यात राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. पथकाने तात्काळ हा साठा जप्त केला असून कारवाईस प्रारंभ केला आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी आर.एम. भरकड आणि उपायुक्त कांबळे यांच्यासह कर्मचार्यांच्या पथकाने केली असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत नेमका किती साठा जप्त करण्यात आला याची माहिती मिळाली नसली तरी हा आकडा मोठा असण्याची शक्यता दिसून आली आहे.
आमदार एकनाथराव खडसे यांनी आजच विधानपरिषदेत मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याबाबत विधानपरिषदे लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी प्रामुख्याने मध्यप्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात येत असून यातून करोडो रूपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर काही तासांमध्येच ही कारवाई करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने कारवाईचा तपशील अद्याप समजला नाही.
हे तर हिमनगाचे टोक : आ. एकनाथराव खडसे
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधीने आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली. यावर ते म्हणाले की, आज मुक्ताईनगरात मोठी कारवाई झाली असली तरी हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे. मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून याचबाबत मी आज विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला. यानंतर मी याच संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बोललो. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा एका बड्या पुढार्याचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.