Home धर्म-समाज फैजपूरात 16 मार्चला मुक्ताई पालखी सोहळ्याचे आगमन 

फैजपूरात 16 मार्चला मुक्ताई पालखी सोहळ्याचे आगमन 


फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आदिशक्ती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे 16 मार्च रोजी फैजपूर शहरात भव्य आगमन होणार असून या ऐतिहासिक सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाचे यजमानपद यावल रावेर तालुक्यांना लाभले असून या पार्श्वभूमीवर फैजपूर शहरात विविध धार्मिक आणि सामाजिक संस्थांकडून स्वागताची जोरदार तयारी करण्यात येत आहे.

यावर्षीच्या मुक्ताई फिरता नारळी सप्ताहाचे आयोजन महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज रविंद्र हरणे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचे 16 मार्च रोजी सकाळी 10 वाजता फैजपूर शहरातील सुभाष चौक येथे आगमन होणार असल्याची माहिती डिंगंबर महाराज चिनवलकर मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी शहरातील भाविक आणि विविध संस्थांकडून विशेष तयारी करण्यात येत आहे.

पालखी सोहळा सुभाष चौकातून खुशाल भाऊ रोड मार्गे पुढे श्रीराम मंदिर येथे पोहोचणार असून त्यानंतर विठ्ठल मंदिर येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे. भाविकांनी विठ्ठल मंदिर परिसरात येऊन पालखीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. तसेच दिंडी मार्गावर स्वच्छता मोहीम राबविणे, रांगोळी काढणे, पुष्पवृष्टी करणे आणि गुढ्या उभारणे यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे.

हा ऐतिहासिक पालखी सोहळा प्रथमच फैजपूर शहरात येत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील विविध मंदिर संस्था आणि धार्मिक मंडळे या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेणार आहेत. सतपंथ मंदिर, महानुभाव मंदिर, स्वामीनारायण मंदिर, खंडोबा मंदिर, गणपती वाडी मंदिर तसेच शहरातील विविध देवी मंदिरांचे मंडळे यामध्ये सहभागी होणार आहेत.

याशिवाय गणेश मंडळ, दुर्गोत्सव मंडळ, खुशाल महाराज रथोत्सव मंडळ, इस्कॉन मंदिर, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, दादाजी धुनिवाले भक्त मंडळ, संत गजानन महाराज भक्त परिवार, साई भक्त परिवार, स्वामी समर्थ सेवा भक्त परिवार तसेच महिला भजनी मंडळे आणि सकल हिंदू समाजातील विविध आध्यात्मिक परंपरांचे अनुयायी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते देखील या धार्मिक सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुक्ताई पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महामंडलेश्वर जनार्धन हरिजी महाराज, श्रीमद भागवत कथा समिती फैजपूर आणि ग्रामस्थांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound