मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये झालेल्या पाणीपुरवठ्यात दूषित वास येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये आज सकाळी पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र, पाणी पिवळसर रंगाचे असून त्याला घाण वास येत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. आधीच शुद्ध पाण्याची टंचाई असताना दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाल्याने साथीचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लहान मुले आणि वृद्धांमध्ये आरोग्याच्या तक्रारी वाढत असून, अनेक नागरिकांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारख्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. नगरपंचायतीने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा मोठा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. “आम्हाला कधी स्वच्छ आणि निरोगी पाणी मिळणार?” हा प्रश्न उपस्थित करत नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनाने त्वरित योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.