जळगाव प्रतिनिधी । सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी तसेच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत विविध गटातंर्गत बॅकांमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेतंर्गत 31 मार्च, 2019 अखेरपर्यंत विविध बँकांनी जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत शिशु गटासाठी 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात या गटात 2 लाख 64 हजार 5 लाभार्थ्यांना 749 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर किशोर गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या गटात 23 हजार 584 लाभार्थ्यांना 285 कोटी 16 लाख रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच तरुण गटासाठी 10 लाख रुपयांपर्यत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. त्यानुसार या गटात 9 हजार 460 लाभार्थ्यांना 195 कोटी 18 लाख रुपयांचे असे जिल्ह्यात एकूण 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हास्तरीय मुद्रा बँक समन्वय समितीच्या बैठकीत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांनी दिली.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतंर्गत जिल्ह्यात सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज वाटपात मायक्रो फायनान्स कंपन्या आघाडीवर असून या कंपन्यांनी जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 144 लाभार्थ्यांना 349 कोटी 41 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर खाजगी क्षेत्रातील व्यावसायकि बँकांनी 53 हजार 770 लाभार्थ्यांना 235 कोटी 33 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्यानंतर छोट्या आर्थिक बँकांनी 40 हजार 938 लाभार्थ्यांना 121 कोटी 84 लाख रुपये, त्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील व्यावसायिक बँकांनी 5 हजार 181 लाभार्थ्यांना 100 कोटी 25 लाख रुपये, स्टेट बँक ऑफ इंडियाशी संलग्न बँकांनी 1199 लाभार्थ्यांना 47 कोटी 69 लाख रुपये व ग्रामीण क्षेत्रातील बँकानी 348 लाभार्थ्यांना 7 कोटी 83 लाख रुपये कर्जाचे वाटप केले असून या कर्जाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित तरुणांनी आपले स्वत:चे व्यवसाय सुरु केले आहे. तर अनेक तरुण रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराकडे वळाले असून मोठया प्रमाणात छोटे व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायात वाढ केली आहे.
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या कर्जासाठी आता बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या कर्जासाठी आता कर्जदारास बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. मुद्रा योजनेचे नवीन संकेतस्थळ सुरु झाले आहे. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना www.udyammitra.in या संकेतस्थळावर किंवा महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या PMMY या पोर्टलवर http://mahamudra.maharashtra.gov.in ऑनालाईन अर्ज सादर करता येईल. अर्जासोबत बँकेचे नाव, शाखा तसेच कर्ज मिळण्यासाठी गटाचे वर्गीकरण आदि संपूर्ण माहिती भरावी. लघु क्षेत्रातील उद्योगासाठी 10 लाखापर्यंतच्या कर्जाबाबत कोणतेही अनुषंगिक तारण न घेण्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे निर्देश असल्याचे श्री. अरुण प्रकाश यांनी म्हटले आहे.
मुद्रा बॅक कर्ज योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी प्रत्येक बँकेच्या शाखेत मुद्रा हेल्प डेस्क सुरु करावा. या योजनेतंर्गत सुशिक्षित बेरोजगारांची प्रकरणे तातडीने मंजूर करावी. याबाबतची माहिती देण्यासाठी सर्व बँकांनी प्रत्येक शाखेत एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
ठळक वैशिष्टे
जिल्ह्यातील 2 लाख 97 हजार 49 लाभार्थ्यांना 1 हजार 229 कोटी 87 लाख रुपयांचे कर्ज मंजूर, शिशु गटात 2 लाख 64 हजार 5 लाभार्थ्यांना 749 कोटी 53 लाख रुपयांचे कर्ज वाटप, किशोर गटात 23 हजार 584 लाभार्थ्यांना 285 कोटी 16 लाख रुपये कर्ज वाटप, तरुण गटात 9 हजार 460 लाभार्थ्यांना 195 कोटी 18 लाख रुपयांचे कर्ज वाटप, 1 लाख 29 हजार 144 लाभार्थ्यांना 349 कोटी 41 लाख रुपयांचे कर्ज वाटप करुन मायक्रो फायनान्स कंपन्यांची आघाडी.