यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे यावल तालुक्यातील मारूळ गावातील एक डीपी अक्षरशः मृत्यूला आमंत्रण देत आहे. ही धोकादायक वीज वितरण पेटी गावात वर्दळीच्या ठिकाणी, म्हणजेच अंगणवाडी, जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, उर्दू अध्यापक विद्यालय, आयुर्वेदिक दवाखाना, ग्रामपंचायत आणि बसस्थानक अशा महत्त्वाच्या आस्थापनांजवळ उघड्यावर आहे.

या उघड्या असलेल्या डीपीच्या पेटीचे झाकणच निखळलेले आहे, तसेच येथे कोणतेही कंम्पाऊंड (संरक्षक कुंपण) देखील नाही. जमिनीपासून केवळ दोन ते तीन फूट उंचीवर असलेली ही धोकादायक डीपी प्रवाशांच्या मार्गावर आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, या उघड्या डीपीजवळ शाळांमधील लहान मुले खेळत असतात. तसेच, अंगणवाडीतील लहान मुलांना किंवा सामान्य नागरिकांना नकळत या डीपीचा स्पर्श झाल्यास मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. या ठिकाणी असलेले विद्युत पुरवठा वाहिनीवर ‘कटआउट’ऐवजी केवळ तार टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे, ज्यामुळे धोका अधिक वाढला आहे.
या दुर्लक्षित आणि धोकादायक वीज वाहिनीमुळे कोणाचेही बरे-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. मारूळ ग्रामस्थ आणि पालकांनी महावितरण कंपनीने याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी धोकादायक डीपीला त्वरित झाकण बसवावे आणि सुरक्षित कंम्पाऊंड उभे करावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडणार नाही. महावितरणने तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



