जळगाव प्रतिनिधी । शहरातील बालाजी पेठ परिसरात असलेल्या पडक्या सागरमल वाड्यात 39 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत शनिपेठ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र पंढरीनाथ येशे (वय 39) रा. कांचन नगर यांचे कांचन नगरात सलुनचे दुकान आहे. दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे गेल्या एक वर्षापासून पत्नी ही मुलाबाळांसह माहेरी राहत होती. जळगावात ते घरात एकटेच राहत होते. 1 जुलै रोजी रात्री बालाजी पेठ मधील सागर मल यांच्या पडक्या वाड्यावर जाउन दारू पीत असताना तोल गेल्याने खाली पडले त्यांचा डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज शनिपेठ पोलीसांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत कोणीही नव्हते, त्यामुळे त्यांचा मृतदेह दोन दिवसापासून त्याच ठिकाणी पडून होता. याबाबत आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलिसांना माहिती मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताचा भाचा धिरज वसाने याने मृतदेह ओळखला. त्यानुसार शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. शनिपेठ पोलिसातील गोपनीय विभागाचे गिरीष पाटील पो.हे.कॉ. धनंजय येवले, किरण वानखेडे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला.