यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीची भरती प्रक्रिया होणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यूपीएससीच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भरती प्रक्रियेत सुधारणा केली जाणार असून, आयोगासाठी निश्चित कॅलेंडर तयार केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. यावर्षीपासून एमपीएससीची परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येणार असून, या निर्णयाला काही नागरिकांचा विरोध असला तरी तो ग्राह्य धरला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात माहिती देताना सांगितले की, लवकरच एमपीएससीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येणार आहे. मात्र, एमपीएससीमध्ये मनुष्यबळ कमी असल्याने स्पर्धा परीक्षांची प्रक्रिया पूर्ण होऊनही उमेदवारांची नियुक्ती रखडते. याशिवाय, काही ठिकाणी नियुक्तीसाठी आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप आमदार विक्रम काळे यांनी विधानसभेत केले होते. या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, अलीकडच्या काळात एमपीएससीमधील सर्व पदे वेगाने भरली गेली असून, सध्या केवळ तीन पदे रिक्त आहेत. ती लवकरच भरण्यात येतील.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले की, यूपीएससीप्रमाणे एमपीएससीलाही निश्चित परीक्षा कॅलेंडर असेल, जेणेकरून परीक्षार्थींना वेळेत तयारी करता येईल आणि भरती प्रक्रियेतील विलंब दूर होईल. या संदर्भात आमदार शिवाजीराव गर्जे यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.

एमपीएससीमधील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या रिक्त असलेल्या तीन पदांपैकी एक पद भरले गेले आहे, तर उर्वरित दोन पदांसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असल्याची माहिती देखील देण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की, परीक्षेचा निकाल लागताच भरती प्रक्रियेला वेग दिला जात आहे आणि यापुढेही ही प्रक्रिया गतीने चालेल. त्यामुळे राज्यातील एमपीएससी परीक्षार्थींसाठी ही सकारात्मक बातमी आहे. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक निश्चित होईल आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Protected Content