भडगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अंजनविहिरे येथे कृषी विभाग आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नैसर्गिक शेती मिशन अभियान’ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. रासायनिक खतांचा वाढता वापर कमी करून शाश्वत शेतीकडे वळण्याचे आवाहन यावेळी तज्ज्ञांनी केले.
तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र (ममुराबाद) येथील विषय विशेषज्ञ डॉ. किरण जाधव यांनी शेतकऱ्यांना ‘दहा ड्रम स्लरी’ बाबत सखोल माहिती दिली. तसेच शेतात जीवामृत, बीडी कंपोस्ट खत आणि दशपर्णी अर्क प्रत्यक्ष कसा तयार करावा, याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व पटवून दिले.

सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांनी नैसर्गिक शेतीचे फायदे स्पष्ट करताना सांगितले की:
नैसर्गिक शेतीमुळे जमिनीची सुपीकता आणि प्रतिकारशक्ती टिकून राहते. उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढतो. ही पद्धत पर्यावरणपूरक असून मानवी आरोग्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजनविहिरेचे सरपंच बापूसाहेब चिंधा धोंडू बाविस्कर होते. यावेळी उप कृषी अधिकारी सुहास भालेराव, कृषी सखी विद्या निलेश पाटील, सपना शशिकांत पाटील, रोजगार सेवक निलेश खंडेराव पाटील यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुखदेव गिरी यांनी केले, तर आभार बीटीएम अमोल सोनवणे यांनी मानले.



