लंडन, वृत्तसेवा | लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयासमोर हजारो लोकांनी पाकिस्तान आणि काश्मीरचा झेंडा हाती घेऊन गुरूवारी घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात लंडनमध्ये आंदोलन करण्यात आले.
भारताने कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे पहायला मिळाले. मदतीसाठी पाकिस्तानने अनेक देशांसमोर विनंती केली होती. परंतु त्यांच्या मदतीसाठी आणि या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास कोणताही देश पुढे आला नव्हता. तसेच भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच दिल्ली लाहोर बससेवा आणि चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. भारताच्या या निर्णयाविरोधात १५ ऑगस्ट रोजी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयामोर प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी ‘काश्मीर इज बर्निंग’, ‘फ्री काश्मीर’ आणि ‘मोदी: मेक टी नॉट वॉर’ अशा आशयाचे फलक घेऊन आंदोलन केलं असल्याची माहिती स्थानिक माध्यमांकडून देण्यात आली. परंतु हे छोटेसे आंदोलन होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशवासींना संबोधित करत काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्याचा उल्लेख केला होता. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता, असेही त्यांनी नमूद केले होते.