Home Cities यावल धनाजी नाना महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सामंजस्य करार; ग्रामीण खेळाडूंना...

धनाजी नाना महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सामंजस्य करार; ग्रामीण खेळाडूंना मिळणार नवे संधीचं व्यासपीठ


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यात नुकताच एक महत्त्वपूर्ण परस्पर सामंजस्य करार (MOU) करण्यात आला आहे. या करारामुळे फैजपूर व परिसरातील खेळाडूंना जिल्हा स्तरावरील क्रीडा सुविधा, प्रशिक्षण, मार्गदर्शन व विविध योजनांचा लाभ मिळणार असून, ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्रासाठी ही एक ऐतिहासिक घडामोड ठरणार आहे.

या सामंजस्य करारावर धनाजी नाना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी श्री रवींद्रजी नाईक यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील, क्रीडा संचालक डॉ. गोविंदराव मारतळे, जीमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. ए. के. पाटील, डॉ. राकेश तळेले, डॉ. हरीश तळेले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

या कराराअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्यातर्फे महाविद्यालय व परिसरातील विद्यार्थ्यांना खेळ क्षेत्रातील शासकीय योजना, प्रशिक्षण, आर्थिक मदत, चर्चा सत्रे, कार्यशाळा व इतर सुविधा पुरवण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील खेळाडूंना अधिक संधी देणे, त्यांच्या क्रीडा क्षमतेचा विकास करणे व त्यांना राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमामुळे विविध खेळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असून, पदक प्राप्त खेळाडूंना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. याशिवाय महाविद्यालयाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास क्रीडा मैदाने, संसाधन व्यक्ती, पायाभूत सुविधा आणि सहकार्य पुरवण्याचे वचन दिले आहे. महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांचा उपयोग प्रशिक्षण व क्रीडा कार्यक्रमांसाठी केला जाईल.

तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार श्री शिरीषदादा चौधरी व व्यवस्थापन मंडळाचे पदाधिकारी यांनी या कराराचे स्वागत केले असून, महाविद्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या करारामुळे महाविद्यालयाचे व परिसरातील खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल होईल, असे प्रतिपादन केले.

प्राचार्य डॉ. वाघुळदे यांनी करारासाठी महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नाईक यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, या करारामुळे महाविद्यालयातीलच नव्हे तर परिसरातीलही खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण होईल आणि स्थानिक स्तरावरून खेळाडूंना मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. क्रीडा संचालक डॉ. गोविंदराव मारतळे यांचे विशेष योगदान यामध्ये लाभले.

या उपक्रमामुळे महाविद्यालयात व परिसरात खेळासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हा करार एक महत्त्वाचा टप्पा ठरून भविष्यातील क्रीडा घडामोडींना चालना देईल, याची खात्री व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound