Home Cities अमळनेर मोटारसायकल चोरट्यास अटक ; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

मोटारसायकल चोरट्यास अटक ; १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना, अमळनेर पोलिसांनी उत्कृष्ट तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या जोरावर मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका सराईत चोरट्यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, मा. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते तसेच मा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज, पोहेकॉ मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, निलेश मोरे, चंद्रकांत पाटील, विनोद सोनवणे, गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांनी या तपासात सक्रिय सहभाग घेतला.

अमळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हे क्रमांक ५०३/२०२५ व १३/२०२६ अंतर्गत मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच विविध ठिकाणचा डंप डेटा तपासला. या तपासादरम्यान संशयित आरोपी अरबाज शेख साजिद मनियार (वय २८, रा. धुळे) याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत, एका विधीसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत आरोपीने चोरी केलेल्या मोटारसायकली धुळे शहरात लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार मा. अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या परवानगीने आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या सूचनेनुसार पोलिस पथकाने धुळे येथे जाऊन कारवाई केली. तेथून हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस (काळा-ग्रे रंग, किंमत अंदाजे ३० हजार रुपये) तसेच सुझुकी अ‍ॅक्सेस १२५ या दोन स्कुटी (काळी व निळी, प्रत्येकी अंदाजे ५० हजार रुपये) असा एकूण १ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या सर्व मोटारसायकलींचा सविस्तर पंचनामा करून त्या अमळनेर पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या आहेत. आरोपी अरबाज शेख साजिद मनियार याला भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये अटक करण्यात आली असून, संबंधित गुन्ह्यांचा पुढील तपास पोहेकॉ चंद्रकांत पाटील व पोहेकॉ मिलिंद सोनार करत आहेत.


Protected Content

Play sound