Home क्राईम  मोटरसायकल चोरीचा अवघ्या ४ तासांत उलगडा ; आरोपी ताब्यात 

 मोटरसायकल चोरीचा अवघ्या ४ तासांत उलगडा ; आरोपी ताब्यात 


पाचोरा-लाईव्हट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरात चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा अवघ्या चार तासांत शोध लावत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेण्याची जलद कारवाई केली आहे. पाचोरा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गुप्त माहितीच्या आधारे संशयिताला पकडून त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल जप्त केली. विशेष म्हणजे या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या १२ तासांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करत कार्यक्षमतेचे उदाहरण दाखवले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत शंकर वाघ (वय ४२, व्यवसाय शेती, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) यांनी १० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ८.३७ वाजता जामनेर रोडवरील राधाकृष्ण पेट्रोलपंप येथे त्यांची हिरो कंपनीची फॅशन प्रो (क्रमांक एमएच-१९ बीआर-४२११) लाल रंगाची मोटरसायकल पार्क करून ठेवली होती. काही वेळानंतर ती मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून १४ मार्च रोजी दुपारी १.५६ वाजता आरोपी तुषार लक्ष्मण आघाडे (वय २७, रा. सातगाव डोंगरी, ता. पाचोरा) याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

तक्रार दाखल होताच पाचोरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास सुरू केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की भारत डेअरी बसस्टॉप परिसरात एक इसम मोटरसायकलसह संशयास्पद हालचाली करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली आणि संबंधित इसमाला ताब्यात घेतले.

पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे असलेली मोटरसायकल ही चोरीस गेलेली असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी विचारपूस केली असता संशयिताने आपले नाव तुषार लक्ष्मण आघाडे (रा. सातगाव डोंगरी) असे सांगत मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पंचांसमक्ष त्याच्या ताब्यातून सुमारे १५ हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची फॅशन प्रो मोटरसायकल जप्त करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी यांनी केला असून अत्यंत वेगाने तपास पूर्ण करत अवघ्या १२ तासांत पाचोरा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पो. हे. कॉ. राहुल शिंपी आणि पो. कॉ. शरद पाटील यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.


Protected Content

Play sound