Home क्राईम मशिदीची दानपेटी फोडली; परराज्यातील चोरटा पोलिसांच्या ताब्यात

मशिदीची दानपेटी फोडली; परराज्यातील चोरटा पोलिसांच्या ताब्यात

0
120

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ परिसरात असलेल्या एका मशिदीचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने आतील दानपेटी फोडली आणि अंदाजे अडीच हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना मंगळवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम पेठ येथील नूर मशीद येथे मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा चोरीचा प्रकार समोर आला. संशयित आरोपी अब्दुल्ला अकबर खान (वय ५०, रा. कोटा, राजस्थान) याने मशिदीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्याने दानपेटी फोडून त्यामध्ये जमा झालेली सुमारे अडीच हजार रुपयांची रक्कम चोरून नेली.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर नूर मशिदीचे मौलाना शेख साविद शेख सलीम (वय ३०, रा. बळीराम पेठ) यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. मौलानांच्या तक्रारीनुसार, दुपारी २ वाजता संशयित आरोपी अब्दुल्ला अकबर खान याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच जळगाव शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि चोरीच्या आरोपाखाली संशयित आरोपी अब्दुल अकबर खान याला अटक केली.

धार्मिक स्थळी चोरी झाल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती, परंतु शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला पकडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound