चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातुन सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने शहरातील अजय जोशी यांच्या गंगा स्वामीलमध्ये अत्यंत देखणे असे तोफगाडे बनविले असून हे सुंदर व मजबूत तोफगाडे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून लवकरच एका सागरी किल्ल्यावर अडगळीत पडलेल्या तोफा ठेवण्याकामी वापरण्यात येणार आहेत.
अत्यंत वैभवात या तोफा या गाड्यावर विराजमान केल्या जातील. हे तोफगाडे बनवण्यासाठी मंगेश चव्हाण यांनी सह्याद्री प्रतिष्ठानला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केल्यामुळे प्रतिष्ठानला हे शिवकार्य करण्याची संधी मिळाली आहे. मदतीचा शब्द दिला आणि तो प्रामाणिकपणे पाळून खरा केल्यामुळे दिलेला शब्द पाळणारा माणूस म्हणून सह्याद्री प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभरातील दुर्ग सेवकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम गेल्या अनेक वर्षापासून करीत असून गेल्या काही महिन्यांपासून गड-किल्ल्यांवर अडगळीत पडलेल्या तोफांना तोफगाडे बसविण्याचे कामही प्रतिष्ठानने लोकवर्गणीच्या माध्यमातून हाती घेतले आहे. याचमुळे अशा कार्यात अशा मोठ्या मनाने मदत करणाऱ्या माणसांची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे दुर्ग प्रेमींचे म्हणणे आहे.