जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘रक्तदान हेच महादान’ ही उदात्त भावना जळगावकरांनी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तकेंद्राने २०२५ या वर्षात ५,००० हून अधिक रक्तदात्यांकडून रक्त स्वीकारून नवा आणि ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे.

अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने हे यश संपादन झाले. महाविद्यालयातील डॉक्टर, विद्यार्थी, तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांनी नियमितपणे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरांना युवक, शासकीय कर्मचारी, सामाजिक संघटनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.

डॉ. ठाकूर यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले, “ही केवळ आकडेवारी नसून, समाजाच्या आरोग्यविषयक जागृतीचे प्रतीक आहे. प्रत्येक रक्तदात्याच्या योगदानामुळे शेकडो गोरगरीब रुग्णांचे तसेच गरोदर मातांचे प्राण वाचले आहेत. याव्यतिरिक्त, थॅलेसेमीया आणि सिकलसेल रुग्णांना वेळेवर रक्तसाठा उपलब्ध झाला आहे.”
पॅथोलोजी विभागप्रमुख डॉ. दिपक शेजवळ यांनी रक्तदात्यांचे आभार मानले आणि पुढील वर्षी हा विक्रम आणखी वाढवण्याचा संकल्प व्यक्त केला. यंदा पहिल्यांदाच, सर्वाधिक रक्तसंकलन करणाऱ्या सुप्रीम इंडस्ट्रीज (६०० युनिट), जगतगुरु नरेंद्राचार्य संस्थान (३०१ युनिट) आणि केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशनसह अन्य संस्थांना रक्तगटाचे संशोधक ‘सर कार्ल लँडस्टीनर’ यांच्या नावाने पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रक्तकेंद्राच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.



