पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील २३ हजार ८५० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवेश प्रक्रिया २६ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या २ लाख ४२ हजार ५१६ अर्जांतून ९३ हजार ९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रतीक्षा यादीत ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी संधी दिल्यानंतर आणखी दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. सोडतीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार शुक्रवारी सायंकाळपर्यंत एकूण ६१ हजार १९३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. त्यामुळे अद्यापही ४४ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत.
नियमित विद्यार्थ्यांना पुरेशी संधी दिल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येत आहे. त्यानुसार पहिल्या प्रतीक्षा यादीतून २३ हजार ८५० विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश २६ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत असे गोसावी यांनी सांगितले.