बालाकोटमधून पाकिस्तानी सैन्याने २०० हून अधिक मृतदेह हलवल्याचा दावा

 

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी लष्कराने २०० हून अधिक मृतदेह बालाकोटमधून खैबर पख्तुनवाला येथे हलवले होते, असा खळबळजनक दावा गिलगिट-बाल्टिस्तानचे स्वातंत्र्य सैनिक सेंगे हसनान सेरिंग यांनी केला आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही त्यांनी पुरावा म्हणून शेअर केला आहे.

पुलवामाला सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळांवर एअर स्ट्राइक केला होता. या हल्ल्यात २५० ते ३५० दहशतवादी ठार केल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे. पण असे कोणते तळ मुळात अस्तित्वातच नव्हते आणि एकही दहशतवादी मारला गेला नाही, असा दावा पाकिस्तान करत आहे. पण या हल्ल्यात खरोखर दहशतवादी मारले गेले असल्याचा दावा आता पाकिस्तानातील गिलगिट प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सेंगे हसनान सेरिंग यांनी केला आहे.

 

स्थानिक उर्दु वर्तमानपत्रांच्या वृत्तानुसार बालाकोटहून २०० दहशतवाद्यांचे मृतदेह पाक लष्कराने खैबर पख्तुनवाला प्रांतात हलवले असल्याचं सेरिंग यांनी म्हटलं आहे. आपल्या विधानाला पुष्टी देण्यासाठी पाकिस्तानी लष्करातील एका अधिकाऱ्याचा व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी लष्करी अधिकारी एका लहान मुलाचं सांत्वन करत आहेत. तसंच हे दहशतवादी जिहादसाठी शहीद झाले, असल्याचंही म्हणत आहे. त्या २०० जणांना शहीद होण्याची संधी मिळाली, आम्हाला मिळाली नाही, असंही या व्हिडिओत मागून कोणतरी बोलतं असल्याचे ऐकू येत आहे. दरम्यान हा व्हिडिओ खरा आहे की संपादित आहे, ते मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.

Add Comment

Protected Content