राज्यात यावर्षी मान्सून लवकरच हजेरी लावणार !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात सध्या कडक उन्हाची तीव्रता जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांत तापमानाने ४५ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला असून, अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवत आहे. या उष्णतेसोबतच काही भागांत अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. अशा या वातावरणात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याने राज्यातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान विषयक खाजगी संस्थेने अर्थात स्कायमेट वेदरने आपल्या अहवालात यंदाच्या मान्सूनसंदर्भात महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनची सुरुवात संथ असणार आहे. मात्र, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशपातळीवर पाहता, स्कायमेटच्या आकडेवारीनुसार यंदा देशात जून ते सप्टेंबर या काळात एकूण ८९५ मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे प्रमाण सरासरीच्या १०० ते १०३ टक्के दरम्यान राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे देशात मान्सून ‘सामान्य’ राहील, असे स्कायमेटने स्पष्ट केले आहे.

मान्सूनचा हा अंदाज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मानला जातो आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे पेरणीची रणनीती आखण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य दिशानिर्देश मिळण्यास मदत होणार आहे. राज्यातील हवामान खात्याच्या अधिकृत घोषणेसह स्कायमेटचा अंदाज खरा ठरतो की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र सध्याच्या उन्हाळ्यात मान्सूनचे आगमन हीच एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल.

Protected Content