अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील जळोद गावातील बसस्थानकाजवळील दुकानाजवळ पैशांवरून एकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना २४ जून रोजी दुपारी २ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, गणेश (नाव बदलले) रा.जळोद ता. अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान २४ जून रोजी दुपारी २ वाजता ते बसस्थानकाजवळील पंचर दुकानावर बसलेले होते. त्यावेळी शालीक देविदास कोळी रा.हिंगोणे सिम ता.अमळनेर हा गणेशकडे आला व पैशांची मागणी केली. त्यावर गणेशने सांगितले की. “मी तुमचे पैसे परत केलेले असून तुम्ही माझ्याकडून जास्त पैशांची मागणी करीत आहेत” असे बोलण्याचा राग आल्याने शालिक कोळी याने पंचर दुकानातील लोखंडी रॉड उचलून जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली. सोमवारी १ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. शालीक कोळी यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे हे करीत आहे.