पतसंस्थांच्या संचालक व कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी प्रशिक्षण वर्ग

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सहकार भारती, जळगाव जिल्हा आणि धरणगाव येथील सर्व पतसंस्थांच्या वतीने सोमवारी २० जानेवारी, २०२५ रोजी “बिना संस्कार नहीं सहकार, बिना सहकार नहीं उध्दार” या ध्येयाने प्रेरित प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम वाणी मंगल कार्यालय, धरणगाव येथे दुपारी १० ते ५ या वेळेत होणार आहे.

धरणगाव व जळगाव जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांच्या संचालक, अधिकारी व कर्मचार्यांसाठी आयोजित या प्रशिक्षण वर्गात सहकार कायद्यातील विविध तरतुदींची माहिती दिली जाईल. प्रशिक्षण वर्गात छत्रपती संभाजी नगर येथील वर्धमान पतसंस्था उपाध्यक्ष श्री. संभाजी राचुरे, ऑडीटर असोसिएशनचे आबासाहेब देशमुख, जयदीप शाह (बळवंत पतसंस्था, जळगाव), धरणगाव अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराथी, आणि धरणगाव सहाय्यक निबंधक विशाल ठाकुर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे, सहकार भारतीचे राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील, महिला प्रमुख श्रीमती रेवती शेंदुर्णीकर आणि जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्राहास गुजराथी यांच्या उपस्थिती मध्ये होईल. कार्यक्रमाची नोंदणी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी सहकार भारती धरणगाव शहर प्रमुख उमेश चौधरी, श्री व्यंकटेश पतसंस्थेचे व्यवस्थापक किरण वाणी यांचेशी संपर्क साधून करावी, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, महामंत्री शशीकांत बेहेडे आणि जिल्हा पतसंस्था प्रकोष्ट प्रमुख प्रशांत धरणगाव तालुका प्रमुख हेमंत जोशी यांनी केले आहे.

Protected Content