नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २०१९ च्या निवडणुकांमध्ये मोदींची त्सुनामी होती, या लोकप्रियतेच्या लाटेत सगळेच वाहून गेले, असे विधान काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केले आहे. २०१९मध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर पहिल्यांदाच देशात एखाद्या काँग्रेस नेत्याने मोदी लाट असल्याचे मान्य केले आहे.
देशात मोदींच्या लोकप्रियतेची लाट आहे, नव्हे मोदींची त्सुनामी आहे. अशी विधानं भाजप नेत्यांनी अनेकदा केली आहेत. पण काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हे कधीच मान्य केले नाही. सलग दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी देशात मोदी लाट असल्याचे मान्य केले आहे. खुर्शीद यांचा २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांत फारुकाबाद मतदारसंघातून दारूण पराभव झाला आहे. ‘या निवडणुकांमध्ये मतदारांनी दिलेल्या मतांसाठी मी त्यांचे आभार मानतो, असेही खुर्शीद यांनी म्हटले आहे. यंदाच्या निवडणुकीत खुर्शीद यांना जेमतेम ५५,००० मते मिळाली आहेत.