कोलकाता (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार फुटतील, असे भाकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्तविले होते. त्यावर नरेंद्र मोदी हे निर्ल्लज पंतप्रधान असून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशा कडवट शब्दात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींना उत्तर दिले आहे. त्या मंगळवारी हुगळी जिल्ह्यातील प्रचारसभेत बोलत होत्या.
पश्चिम बंगालच्या श्रीरामपूर येथे सोमवारी नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. यावेळी त्यांनी २३ मे रोजी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर ममतांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ममता यांनी म्हटले की, नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य घटनाविरोधी असून ते घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत. ते निर्ल्लज पंतप्रधान आहेत. या वक्तव्यासाठी नरेंद्र मोदी यांची उमेदवारी रद्द केली पाहिजे. ते घटनात्मक पदावर राहून संविधानविरोधी वक्तव्ये करत आहेत. त्यामुळे मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा हक्क नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. त्यामुळे आता भाजप ममतांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे लक्ष लागले आहे.