नवी दिल्ली-वृत्तसेवा । भाजपचे ओडिशातील बारगडचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात थेट तुलना केली. त्यांच्या मते, मागील जन्मात नरेंद्र मोदी हेच छत्रपती शिवराय होते आणि देशाच्या विकासासाठी त्यांनी पुनर्जन्म घेतल्याचा अजब दावा त्यांनी केला. या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा गदारोळ उडाला आहे.
संसदेत बोलताना त्यांनी ओडिशातील संत गिरीजाबाबा यांचा हवाला देत खासदार प्रदीप पुरोहित यांनी ही माहिती दिली. मात्र, त्यांच्या या विधानामुळे मोठा वाद उफाळला असून, सोशल मीडियावर त्यांच्यावर तीव्र टीका केली जात आहे. पुरोहित यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आणि त्यांचा इतिहास हा संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे, त्यामुळे अशी तुलना अयोग्य असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
पुरोहित यांच्या विधानावर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावरही लोकांनी त्यांना जोरदार सुनावले आहे. अनेकांनी हे विधान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे असल्याचे म्हटले आहे.