मुक्ताईनगर पंकज कपले । मोदी सरकारने अत्यंत विधायक भूमिकेतून केलेल्या कामांमुळे आणि धोरणांमुळे समाजातील शेतकरी , मजूर , व्यापारी , कामगार , उद्योजक असे सगळेच घटक समाधानी आहेत असे आज खासदार रक्षाताई खडसे यांनी सांगितले.
मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज ७ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, या ७ वर्षात भारताची देशभरात प्रतिमा उंचावली आहे. त्या आधी जगाच्या दृष्टीने आपला देश दखलपात्र समाजला जात नव्हता. मोदी यांच्या धोरणातून जगातील अन्य देशांशी संबंध सुधारल्याने व्यावसायिक आणि उद्योगांच्या संधी भारतीयांसाठी वाढल्या आहेत. रेल्वेच्या सुविधा आधुनिक निर्माण करतानाच कमीकमी वेळेत जास्त अंतर कापणाऱ्या सुपरफास्ट रेल्वे वाढल्या आहेत. खास शेतमाल वाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढला आहे. किफायतशीर खर्चात शेतमाल देशात कुठेही पाठवतांना शेतकऱ्यांना मालाचा जास्त पैसे मिळू लागला आहे. केळीसाठी रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना या रेल्वेचा मोठा फायदा गेल्या ८ महिन्यात झाला आहे. पीक विमा योजना महत्वाची ठरली आहे. जनधन खात्यांपासून दुर्बल घटकांच्या अन्य लाभाच्या योजनांचाही व्याप्ती मोदी सरकारने वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट लाभाची रक्कम पाठविणे सुरु आहे. समाजातील कोणताच घटक त्याच्या विकासाच्या संधीपासून वंचित राहू नये हे मोदी यांच्या नेतृत्वाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
खासदार रक्षाताई खडसे पुढे म्हणाल्या की हिंदू राष्ट्र म्हणून असलेली देशाची ओळख ठळक करणारा अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दाही मोदी सरकारने प्रभावीपणे हाताळाला आहे आता २ वर्षात अयोध्येत राम मंदिर उभे राहणार आहे . कोरोनाकाळात अन्य देशांना भारताने आपली परिस्थिती सावरत कोरोना लशी, औषधी, वैद्यकीय उपकरणे निर्यात केली आहेत त्यांना महत्वाची मदत केलीय. रस्ते, आरोग्य आदी मूलभूत सुविधांच्या क्षेत्रात मोदी सरकारची धोरणे प्रभावी ठरल्याने अगदी रस्ते वाहतूक, रेल्वे आणि लहान जिल्ह्याच्या ठिकाणांचीही विमानांची कनेक्टिव्हीटी वाढली आहे त्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत, असेही त्या म्हणाल्या.