मोदी सरकारने कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी : उद्धव ठाकरे

Uddhav ayodhya

 

अयोध्या (वृत्तसंस्था) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या नवनिर्वाचित १८ खासदारांसह अयोध्येतील रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा व कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी, या मागणीचा पुनरूच्चार उद्धव यांनी केला.

 

अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकारने अध्यादेश काढावा. भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे. तसेच आम्ही एनडीएतील सर्व पक्ष त्यांच्यासोबत आहोतच. आपल्याकडे खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे अध्यादेश आणून आपण राम मंदिर बांधू, असेही उद्धव म्हणाले. तसेच ही जागा अशी आहे, जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावे. हिंदूंची एकता कायम राहिली पाहीजे. पहिले मंदिर आणि मग संसद हे आम्ही आचरणातून दाखवून दिले आहे, उद्या संसदेचे कामकाज सुरू होत आहे, त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आले आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच राम मंदिर व्हावं ही लोकांची इच्छा आहे. नरेंद्र मोदी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता आहे. राम मंदिर व्हावे ही बाळासाहेबांना वाटत होते. हिंदू लोकांनी एकत्र राहावे यासाठी शिवसेनेने कधीही महाराष्ट्राच्या बाहेर निवडणुका लढविल्या नाहीत असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. अयोध्येत भव्य राम मंदिर व्हावं, ही जनतेची भावना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पवित्र काम निश्चितच करतील, हा आमचा विश्वास असल्याचे नमूद करताना, या कार्यात त्यांना आमची पूर्ण साथ राहील, असेही उद्धव पुढे म्हणाले.

Protected Content