Home राजकीय इंस्टाग्रामवर मोदींचे १० कोटी फॉलोअर्स; ठरले जगातील पहिले राजकारणी

इंस्टाग्रामवर मोदींचे १० कोटी फॉलोअर्स; ठरले जगातील पहिले राजकारणी


नवी दिल्ली-वृत्तसेवा ।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंस्टाग्रामवर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या १०० मिलियन म्हणजेच १० कोटींवर पोहोचली असून, हा टप्पा गाठणारे ते जगातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत.

पंतप्रधान मोदी २०१४ मध्ये इंस्टाग्रामशी जोडले गेले होते. तेव्हापासून त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत गेली. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत मोदींचे दुप्पटहून अधिक फॉलोअर्स आहेत. ट्रम्प सध्या सुमारे ४३.२ मिलियन फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांटो (१५ मिलियन), ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा (१४.४ मिलियन) आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन (११.६ मिलियन) यांचा समावेश आहे. जगातील अव्वल पाच नेत्यांच्या एकत्रित फॉलोअर्सपेक्षाही मोदींचे फॉलोअर्स अधिक आहेत, ही बाब विशेष लक्षवेधी ठरली आहे.

१२ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर प्रवेश केला. म्यानमारमधील आसियान परिषदेतला त्यांचा पहिला फोटो पोस्ट होताच काही तासांतच ५० हजार फॉलोअर्स जोडले गेले.

२०१७-१८ दरम्यान त्यांनी १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला. २०१९ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेला आणखी वेग मिळाला आणि २०२० पर्यंत हा आकडा ४ कोटींवर पोहोचला. कोविड-१९ काळातील संदेश आणि मोहिमांमुळे त्यांच्या अकाउंटला मोठा प्रतिसाद मिळाला.

२०२२ पर्यंत त्यांचे ७ कोटी फॉलोअर्स झाले, तर २०२३ मध्ये हा आकडा ८ कोटींवर गेला. जुलै २०२४ मध्ये ९ कोटी आणि २०२५ मध्ये ९.५ कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार करत अखेर बुधवारी रात्री त्यांनी १० कोटींचा ऐतिहासिक आकडा गाठला.

इंस्टाग्रामप्रमाणेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पंतप्रधान मोदींचे मोठे वर्चस्व आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या सध्या १०६ मिलियनपेक्षा अधिक आहे. फेसबुकवर ५४ मिलियन, तर व्हॉट्सॲप चॅनेलवर सुमारे ११.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.

इंस्टाग्रामवरील १० कोटी फॉलोअर्सचा टप्पा गाठल्यानंतर पंतप्रधान मोदींचा जागतिक डिजिटल प्रभाव अधिक ठळक झाला आहे. राष्ट्रीय उपक्रम, परदेश दौरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जनतेशी थेट संवाद यामुळे त्यांच्या सोशल मीडिया खात्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound