नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींची गरज असल्याने त्यांना निवडून देण्याचे आवाहन देशातील ९०० पेक्षा अधिक कलाकारांनी केले आहे. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय, गायक शंकर महादेवन, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेक सुप्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे. या सर्व कलाकारांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध करीत देशाला ‘मजबूर नव्हे, तर मजबूत सरकार’ आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचं आवाहन या कलाकारांनी केले आहे.
‘पंतप्रधान म्हणून देशाला नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे. ही काळाची गरज आहे. दहशतवादासारखी आव्हाने देशासमोर असताना ‘मजबूर’ नव्हे, तर ‘मजबूत’ सरकारची गरज आहे. त्यामुळेच आताचं सरकारच सत्तेत राहायला हवं,’ असं ९०० हून जास्त कलाकारांनी या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये त्रिलोकी नाथ मिश्रा, कोयना मित्रा, हंस राज हंस यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देशानं भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि विकासाभिमुख प्रशासन पाहिले आहे, अशा शब्दांमध्ये कलाकारांनी त्यांच्या निवेदनात मोदी सरकारचे कौतुक केले आहे.
विशेष म्हणजे आठवड्याभरापूर्वीच ६०० हून अधिक कलाकारांनी भाजपा आणि मित्र पक्षांविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये अमोल पालेकर, नसिरीद्दुन शहा, गिरीश कर्नाड यांचा समावेश होता. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांना सत्तेतून खाली खेचण्याचं आवाहन या मंडळींनी केलं होतं. मोदी कायम सत्तेत राहिल्यास संविधानाला धोका असल्याची भीती या कलाकारांनी व्यक्त केली होती. गेल्या गुरुवारी १२ भाषांमध्ये हे संयुक्त निवेदन प्रसिद्ध आर्टिस्ट युनाईट इंडियाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते.