Home धर्म-समाज लेवा पाटीदार समाजात विवाह सुधारणांसाठी आदर्श आचारसंहिता; सावदा येथे बैठकीत महत्त्वाचे निर्णय

लेवा पाटीदार समाजात विवाह सुधारणांसाठी आदर्श आचारसंहिता; सावदा येथे बैठकीत महत्त्वाचे निर्णय


सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लेवा पाटीदार समाजात विवाह सोहळ्यातील वाढता खर्च, अनावश्यक दिखावा आणि पारंपरिकतेशी विसंगत ठरणाऱ्या प्रथांना आळा घालून साधेपणा व पारंपरिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने गुरुवारी (३१ जुलै २०२५) सकाळी ९ वाजता सावदा येथील डॉ. व्ही. जे. वारके यांच्या सुश्रुत हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

विवाह आदर्श आचारसंहितेवर सखोल चर्चा
या बैठकीत विवाहविषयक आदर्श आचारसंहितेच्या २७ नियमांवर सखोल चर्चा करण्यात आली. समाजहितासाठी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, यावर ठोस निर्णय घेण्यात आले. समाजातील विवाह सोहळे अधिक साधे, अर्थपूर्ण आणि पारंपरिक मूल्यांशी सुसंगत कसे बनवता येतील, यावर विचारमंथन झाले.

मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अरुण बोरोले, साहित्यिक प्रा. व. पू. होले, पुणे पिंपरी चिंचवड येथील पाटीदार मंडळाचे पदाधिकारी कृष्णाजी खडसे, दिलीप चौधरी, माजी नगरसेवक अजय भारंबे, संपादक श्याम पाटील, फैजपूर येथील सातपुडा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, मस्कावद येथील शिक्षक प्रवीण वारके, उधळी येथील प्रगतिशील शेतकरी ललित पाटील, अनिल नेमाडे, योगेश्वर महाजन, ज्योती पाटील, योगिनी पाटील, नलिनी बेंडाळे, हर्षल जावळे, जयेश पाटील, ईशान पाटील, तुषार पाटील, अशोक चौधरी, संदीप महाजन, संतोष पाटील, विजय वारके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन नंदकुमार पाटील यांनी केले.

नवे नियम आणि सुधारणा
या प्रस्तावित संहितेमध्ये विवाहात फुगे, फटाके, डीजे आणि धुरांडे यांसारख्या अनावश्यक गोष्टी टाळण्यावर भर देण्यात आला आहे. त्याऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, वरातीत नाचगाणे व मद्यपान पूर्णपणे थांबवावे आणि मुहूर्तावरच लग्न लागावे असे स्पष्ट करण्यात आले. स्टेजवरच अक्षता टाकणे, वर-वधूला उचलण्यास बंदी, फक्त पाच पदार्थांचे स्नेहभोजन आणि पाहुण्यांची संख्या ५०० पर्यंत मर्यादित ठेवणे यांसारखे महत्त्वाचे मुद्देही ठळकपणे अधोरेखित करण्यात आले. प्री-वेडिंग शूट्स, हळदी व लग्न एकत्र ठेवणे, साखरपुडा १०० लोकांच्या उपस्थितीत घरच्या घरी करणे, आमंत्रणपत्रिका सोशल मीडियावरून पाठवणे, आहेर व हुंडा बंद करणे अशा खर्चिक आणि नव्या प्रथांना आळा घालण्यासाठी सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.

आरोग्य तपासणी आणि सामाजिक उपक्रम
याशिवाय, विवाहात पारंपरिक वेशभूषेला प्राधान्य, केक कापण्यास बंदी, ‘रुखवत’ बंद करणे, मांडव चुकता प्रथेमार्फत समाजोपयोगी संस्थांना देणगी देणे, मंगळसूत्र कायम गळ्यात ठेवणे, तसेच वधू-वर व पालकांची वैद्यकीय तपासणी आणि समुपदेशन अनिवार्य करणे असेही महत्त्वाचे नियम प्रस्तावित झाले आहेत.

अंमलबजावणी आणि आवाहन
या नियमांचे पालन करणाऱ्या कुटुंबांचा महासंघाच्या वतीने सत्कार केला जाईल. तर संहितेचे पालन न करणाऱ्या विवाह प्रसंगी उपस्थित समाजबांधवांनी शांततेत निघून जावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक गावातून १०-१५ युवकांची टीम तयार करून समाजप्रबोधन व अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. बैठकीच्या शेवटी, समाजातील प्रत्येक सदस्याने संहितेवरील आपली मते लेखी स्वरूपात दिल्यानंतर अंतिम संहितेचे स्वरूप निश्चित केले जाईल, असे ठरविण्यात आले. लेवा समाजबांधवांनी ही आदर्श संहिता प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound