मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मोबाईल चोरून पळणार्या एका चोराचा जमावाने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. नालासोपारा पूर्वेच्या वालईपाडा येथे बुधवारी पहाटे ही घटना घडली. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी ९ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. नालासोपारा येथे संतोष भुवन परिसरात राहणाऱ्या अजय मिश्रा या तरुणाच्या घरात बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती. अज्ञात चोराने खिडकीजवळ ठेवलेला मोबाईल लंपास केला होता. या चोराचा परिसरात शोध सुरू असता वालईपाडा येथे काही जमावाने एका चोराला पकडले. त्याच्याकडे चोरलेला मोबाईल फोन आढळला.
जमावाने त्याला बांबूने तसेच लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो बेशुध्द झाला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला उपचारासाठी पालिकेच्या विजयनगर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या मयताची ओळख पटली असून त्याचे नाव अभिषेक सोनी (२३) आहे. मयत अभिषेक हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यात घरफोडीचे ४ आणि अमली पदार्थ सेवनाचे २ गुन्हे दाखल आहेत. सकाळी नळावर पाणी भरण्यासाठी लोक जमा झाले होते. तेव्हा अभिषेक पळताना दिसला आणि जमावाने त्याला पकडून मारहाण केली अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांनी दिली. बुधवारी सकाळी ६ ते ७ सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आम्ही प्राथमिक तपासात ९ हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ५ जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड यांनी दिली.