पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकिल संघ पाचोरा याचे संयुक्त विदयमाने दि. २० जून २०२२ रोजी पाचोरा तालुक्यातील वेरूळी खु” येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे.
उच्च न्यायालय, विधी सेवा उप समिती, औरंगाबाद तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांचे आदेशान्वये माहे जून २०२२ मध्ये जळगांव जिल्हयात येणारी मोबाईल लोक अदालत व्हॅन ही एकूण १४ दिवस जळगांव जिल्हयातील १४ तालुक्यात दि. ९ जुन २०२२ ते दि. २२ जुन २०२२ या कालावधीत फिरवायची आहे.
त्याच अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकिल संघ पाचोरा याचे संयुक्त विदयमाने दि. २० जून २०२२ रोजी पाचोरा तालुक्यातील वेरूळी खु” येथे फिरते लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, वकील मंचाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. चंदनसिंग राजपुत, सचिव अॅड. राजेंद्र पाटील, जेष्ठ विधीज्ञ अॅड. एस. पी. पाटील, विस्तार अधिकारी श्री. सुरवाडे, ग्रामसेवक शरद पाटील हे उपस्थित होते.
या लोक अदालतमध्ये नियमीत दिवाणी दावे, नियमीत दरखास्त, संक्षीप्त फौजदारी खटले, धनादेश अनादर, वैवाहिक प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येणे शक्य आहे. असे दिवाणी व फौजदारी खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवता येतील. याशिवाय राष्टीयकृत बँका, दूरध्वनी व वीज कार्यालय, ग्रामपंचायत घरपट्टी /पाणीपट्टी बाबतची वादपूर्व प्रकरणे थकीत रकमेमध्ये सूट देणेबाबत प्रस्तावित केलेले आहे.
याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश जी.बी. औंधकर यांनी पाचोरा तालुका परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, दिनांक २० जुन २०२२ रोजी होणा-या फिरते लोक न्यायालयात वादातीत व वादपूर्व प्रकरणे तडजोडीने सोडविणेकरिता जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोकन्यायालय या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा व आपल्या प्रलंबीत केसेस फिरते लोकअदालत मध्ये ठेवण्यासाठी तालुका विधी सेवा समिती कार्यालय पाचोरा यांचेशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.