पंढरपूर वृत्तसंस्था । उद्यापासून (दि.1 जानेवारी) विठ्ठल मंदिरात मोबाइल बंदीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मंदिर समितीने अडीच हजार लॉकर्सची यंत्रणा बसविली आहे ज्यामध्ये जवळपास दहा लाख भाविकांचे मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
आज सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हजारो पर्यटक पंढरीत दाखल झाले असून विठ्ठल मंदिराची दर्शन रांग चंद्रभागेच्या पात्रापर्यंत पोचली आहे. या भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर समितीच्या नवीन भक्तनिवासात फुले आणि फुग्यांच्या साहाय्याने आकर्षक सजावटीचे काम सुरू आहे. सर्व भक्त निवास इमारती पर्यटकांनी ओव्हरपॅक झाल्या आहेत. उद्या म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीचा निर्णय काटेकोरपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे आता मंदिराजवळील दर्शन मंडपात मोबाईल लॉकरच्या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी विठुरायाच्या दर्शन रांगेत उभारण्यापूर्वी भाविकाला आपले मोबाईल या लॉकरमध्ये आणून पावती घ्यावी लागणार आहे. मोबाईल ठेवण्यासाठी आपले ओळखपत्र आवश्यक असणार असून त्याशिवाय भाविकाला मोबाईल ठेवता येणार नाहीत. मोबाईल ठेवल्यावर भाविकाला पावती दिली जाणार असून यासाठी प्रति मोबाईल दोन रुपये सेवा शुल्क द्यावा लागणार आहे. दर्शनाला कितीही वेळ लागला तरी पुन्हा मोबाईल घेताना त्याला वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. यात्रा काळात देवाच्या दर्शनाला 18 ते 20 तासांपर्यंत वेळ लागत असल्याने ही सुविधा समितीने दिली आहे. नवीन वर्षाचे पहिले काही दिवस संपल्यावर पुन्हा गर्दीचा ओघ कमी होणार असल्याने समितीला या व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करता येणार आहेत.