जळगाव (प्रतिनिधी) देशातील विविध राज्यात घडलेल्या मॉब लिंचिंगच्या निषेधार्थ आज जळगावात बहुजन क्रांती मोर्च्याच्यावतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात मागील ४ वर्षापासून २६६ मॉब लिंचिंगच्या वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत. जे मानवतेला लाच्छंनास्पद आहे. या घटनांमध्ये फक्त एकट्या झारखंड राज्यामध्ये एकुण १८ घटना घडलेल्या आहेत. हे एक राजकीय षड्यंत्र आहे. या घटनांमध्ये प्रामुख्याने मुस्लिम युवकांची हत्या होत आहे. विशेष म्हणजे अशा आरोपींना सरकार पाठीशी घालत असल्याचा प्रकार संपूर्ण देशभरात पहावयास मिळत आहे. यातीलच एक भाग म्हणून दिनांक १७ जून २०१९ तरबेज अन्सारी या युवकाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पप्पु मंडल आणि त्यांचे सहकारी यांनी सामुहिकरित्या मारहाण करून हत्या केली.
यापुढे मॉब लिंचिंग विरोधी कायदा बनवून त्या कायद्यातंर्गत आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. पप्पु मंडल आणि त्यांचे सहकारी यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर फास्टट्रॅक कोर्टामार्फत सुनावणी होवुन फाशीची शिक्षा देण्यात यावी. तरबेज अन्सारीच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देऊन त्याच्या माता-पिता व भावांना एक करोड रूपयांची आर्थिक मदत करावी. मॉब लिचिंगमध्ये शामील झालेल्या राजकीय पक्ष, सामाजिक संस्था व संघटनांची मान्यता रद्द करण्यात यावी. अल्पसंख्यांक समाजाच्या हितार्थ त्यांची रक्षा करण्यासाठी नवीन कायद्याची निर्मिती करण्यात यावी. एस.सी., एस.टी., ओ.बी.सी. व धार्मिक अल्पसंख्यांक जनसमुदायाच्या हितासाठी नवीन कायद्याची निर्मिती करून त्यांची रक्षा करण्यात यावी. दोशींना मदत करणा-या पोलीस कर्मचारी व अधिका-यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे. ‘वायलेन्स प्रिवेंशन अॅक्ट फॉर मायनॉरिटी’ या कायद्याची त्वरीत निर्मिती करण्यात यावी,अशा विविध मागण्यांचा समावेश होता.