Home Cities जळगाव मनसे वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा सुरु; प्रवाशांना शिस्तबद्ध सेवेचा दिलासा

मनसे वाहतूक सेनेचा पहिला रिक्षा थांबा सुरु; प्रवाशांना शिस्तबद्ध सेवेचा दिलासा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील शिस्तबद्धता आणि सुविधा सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा पहिला अधिकृत रिक्षा थांबा रेल्वे स्टेशन परिसरात कार्यान्वित करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना सुरक्षित, सुटसुटीत आणि शिस्तबद्ध रिक्षा सेवा मिळणार असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.

या रिक्षा थांब्याच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार आणि मनसे नेते ॲड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते स्टेशन परिसरातील २० रिक्षांवर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे ओळखपत्रीय स्टिकर लावण्यात आले. त्यामुळे अधिकृतपणे या थांब्यावरून प्रवास करणाऱ्या रिक्षांची ओळख पटवणे आणि सेवेत पारदर्शकता ठेवणे शक्य होणार आहे.

या उपक्रमाचे नियोजन मनसे वाहतूक सुरक्षा जिल्हा संघटक रज्जाक सय्यद आणि सहकारी महेंद्र सपकाळे यांनी केले. या उपक्रमाच्या माध्यमातून मनसेने रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये एक नवा संवाद निर्माण केला आहे. एकाच ठिकाणी अधिकृत रिक्षा थांबा उपलब्ध झाल्यामुळे प्रवाशांना अधिक सोयीस्कर व नियोजनबद्ध सेवा मिळणार आहे.

कार्यक्रमाला ललित शर्मा, चेतन पवार, श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, सतीश सैंदाने, संजय मोती, साजन पाटील, विकास पाथरे, दीपक सोनवणे, विशाल जाधव, हारून शेख, अरुण पटेल, अन्नू बिस्ती, रौफ खाटिक यांच्यासह मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी रिक्षाचालकांमध्येही विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या पहिल्या उपक्रमाच्या माध्यमातून मनसेने शहरात वाहतूक व्यवस्थेत शिस्त आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. लवकरच शहरातील इतर प्रमुख भागांमध्येही अशा प्रकारचे अधिकृत रिक्षा थांबे सुरू करण्यात येणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले. याचवेळी रिक्षाचालक, शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे चालक आणि मिनी बस चालक यांना मनसे वाहतूक सेनेचे सभासद होण्यासाठी आवाहन करण्यात आले.


Protected Content

Play sound