मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसेचे नेते आणि ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांना मनसे कडून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र मनसेला या निवडणूकीत एकही जागा जिंकता न आल्याने पराभव जिव्हारी लागलेल्या अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवला आहे. मनसे पक्ष प्रमुखांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी ठाणे, पालघर येथील विधानसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मनसेला २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमधून अनेक मोठ्या अपेक्षा होत्या. भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री होईल आणि तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याने सत्तेत बसेल असा विश्वास राज ठाकरेंनी निवडणूकीच्या प्रचारात बोलून दाखवला होता मात्र प्रत्यक्षात राज ठाकरेंची एकही जागा निवडून न आल्याने सध्या राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी बोलून या पराभवामागील कारणं शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी अविनाश जाधव यांनी अन्य मनसे उमेदवारांसोबत राज ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे.