पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा, चाळीसगाव आणि एरंडोल विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी अखेर भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. वाघ यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसत असून, राजकीय चर्चांना वेग आला आहे.
अनिल वाघ यांनी मनसे जिल्हाध्यक्षपदावर असताना भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी मनसेऐवजी आपल्या पत्नी योगिता वाघ यांना भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक ११ मधून उमेदवारी मिळवून दिली होती. मनसे आणि भाजपमध्ये कोणतेही औपचारिक युती नसताना घेतलेल्या या निर्णयाने त्यावेळी भडगाव शहरात मोठी चर्चा झाली होती.

या पार्श्वभूमीवर, आता अनिल वाघ यांनी स्वतःच भाजपमध्ये प्रवेश केल्याने, पत्नीला उमेदवारी देण्याचा निर्णय हा पूर्वनियोजित राजकीय खेळी होती का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. मनसेचा ‘जय महाराष्ट्र’ करत वाघ यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने, त्यांच्या राजकीय अस्तित्वावर आणि प्रभावावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



