मनसे उद्या करणार लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा?

283877 rajt

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भातील अधिकृत घोषणा उद्या मनसेच्या 13व्या वर्धापनदिनी स्वतः राज ठाकरेच करतील. ते महाराष्ट्रात काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बाहेरून पाठिंबा देण्याचीही शक्यता आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांपासून राज ठाकरे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारावर टीकेची झोड उठवताहेत. जाहीर भाषणांमधून आणि व्यंगचित्रांमधून ते मोदी सरकारला फटकारत आहेत. नोटाबंदी, जीएसटी, बुलेट ट्रेन इथपासून ते अगदी पुलवामा हल्ला आणि ‘एअर स्ट्राईक’पर्यंतच्या घडामोडींवरून त्यांनी मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. दरम्यान, 2014च्या लोकसभा निवडणुकीवेळीही, रिंगणात उतरायचं का, याबाबत राज ठाकरे संभ्रमात होते. तेव्हा त्यांचा नरेंद्र मोदींना ‘शत प्रतिशत’ पाठिंबा होता. परंतु, अगदी शेवटच्या क्षणी त्यांनी आपले मोजकेच शिलेदार मैदानात उतरवले होते. निवडणुकीत मोदी लाट उसळूनही मनसेच्या उमेदवारांना चांगली मतं मिळाली होती. ती या निवडणुकीत नक्कीच वाढतील आणि भाजपा-शिवसेना युतीला तगडे आव्हान देता येईल, असा अंदाज मनसे नेतृत्वला आहे. जिथे मनसेचा उमेदवार नसेल, तिथे आघाडीच्या उमेदवाराला बाहेरून पाठिंबा देण्याची ‘ खेळीही ऐनवेळी खेळली जाऊ शकते.

Add Comment

Protected Content