
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील सोनी नगर भागात प्रलंबित असलेल्या नाला रुंदीकरणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून महापालिका प्रशासनाला ४८ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. प्रल्हाद नगरमधून येणाऱ्या नाल्याची रुंदी अचानक कमी झाल्याने परिसरात सांडपाण्याची समस्या गंभीर बनली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रल्हाद नगरकडून वाहणाऱ्या नाल्याची मूळ रुंदी सुमारे ८ फूट आहे. मात्र सोनी नगरमधील चैतन्य किराणा स्टोअर्ससमोर हा नाला अवघ्या २ फुटांवर येतो. त्यामुळे मोठ्या प्रवाहाचा ‘बॉटलनेक’ निर्माण होऊन पाण्याचा निचरा सुरळीत होत नाही. परिणामी नाल्यातील घाण पाणी रस्त्यावर साचत असून काही ठिकाणी घरांमध्येही शिरत आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथींचा धोका वाढला आहे. पावसाळा नसतानाही ही परिस्थिती गंभीर असताना पावसाळ्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या; मात्र ठोस कारवाई न झाल्याने संताप वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शहर अभियंता योगेश बोरोले यांची भेट घेऊन खरमरीत निवेदन सादर केले. “आता चर्चा नको, कृती हवी,” अशी ठाम भूमिका मांडत पुढील ४८ तासांत नाल्याचे मोजमाप करून प्रत्यक्ष रुंदीकरणाच्या कामास सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली.
मनसे कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, दिलेल्या मुदतीत काम सुरू झाले नाही तर कोणतीही शासकीय परवानगी न घेता स्वतः जेसीबी मशीन आणून नाल्याचे रुंदीकरण करण्यात येईल. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, चेतन पवार, विशाल सोनार, राहुल चव्हाण, खुशाल ठाकूर यांच्यासह पत्रकार नरेश बागडे, भीमराव सोनवणे, अजय राणा, ममता राणा, सुनिता भोई, ममता शिंदे, गणेश सुपेकर, अण्णाभाऊ आणि सोनी नगर परिसरातील असंख्य संतप्त नागरिक उपस्थित होते.



