जळगाव (प्रतिनिधी) शहर महानगरपालिका कामगार युनियनतर्फे आज (दि.२ जून) महापालिकेसमोर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
महानगरपालिका व नगरपालिका मध्ये १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश उपसंचालक दगा मोरे व सहाय्यक संचालक कल्पिता पिंगळे यांनी परिपत्रकाद्वारे दिले आहेत. दरम्यान या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप अध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी केला आहे. याप्रसंगी मनोहर तेजी, तुषार चांगरे, सुरेश सांगोले आदींनी सहभाग घेतला. या एक दिवशी आंदोलनास जळगाव मनपा कामगार संघानेही पाठिंबा दर्शवला आहे.
सातवा वेतन आयोग जुलै ऑगस्टपासून अमलात आणण्याच्या सूचना प्रशासनाला द्याव्या, कारण शासनाच्या ३० जानेवारी २०१९ रोजीच्या आदेशानुसार वेतनवाढीसाठी दिनांक १ जानेवारी व १ जुलै असे वार्षिक दोन वेतन वाढीचे दिनांक राहतील, असे स्पष्ट केलेले आहे. तरी शासन निर्णयाप्रमाणे सातवा वेतन आयोग दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू करून प्रत्यक्ष १ जुलै २०१९ पेड ऑगस्ट २००५ पासून सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आंदोलकांतर्फे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.