Home Cities जळगाव आमदार पुत्राची राजकारणात दणदणीत एन्ट्री! विशाल भोळे यांची बिनविरोध निवड

आमदार पुत्राची राजकारणात दणदणीत एन्ट्री! विशाल भोळे यांची बिनविरोध निवड


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने आपला वरचष्मा कायम राखला आहे. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीच्या सहा उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला असून, शुक्रवारी २ जानेवारी रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार राजुमामा भोळे यांचे चिरंजीव विशाल भोळे यांची प्रभाग ७ ‘क’ मधून बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

विशाल भोळे यांच्या या विजयामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या राजकारणात आपले पहिले पाऊल अत्यंत दमदारपणे ठेवले आहे. त्यांच्या निवडीची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

महायुतीचा ‘बिनविरोध’ षटकार:
जळगाव महापालिकेत आतापर्यंत महायुतीचे एकूण ६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये शिवसेना (शिंदे गट) ४, तर भारतीय जनता पक्षाचे २ उमेदवार आहेत. भाजपच्या वतीने यापूर्वीच प्रभाग १२ ‘ब’ मधून माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांची निवड बिनविरोध झाली होती. त्यानंतर आज विशाल भोळे यांच्या रूपाने भाजपची दुसरी जागा निश्चित झाली.

शिंदे गटाचे वर्चस्व:
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटानेही चार जागांवर बाजी मारली आहे. यामध्ये आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ. गौरव सोनवणे (प्रभाग १८ अ), मनोज चौधरी (प्रभाग ९ अ), प्रतिभा देशमुख (प्रभाग ९ ब) आणि रेखा चुडामण पाटील (प्रभाग १९ अ) यांचा समावेश आहे. अर्ज माघारीच्या प्रक्रियेनंतर महायुतीचे पारडे जड झाले असून, महत्त्वाच्या प्रभागांमध्ये बिनविरोध निवड झाल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता उरलेल्या जागांवर होणाऱ्या लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound